स्वयंशिस्त की संचारबंदी | आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सवाल |Tukaram Mundhe | Wazir Online

2020-07-11 11

नागपुरात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सुरू झालेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. परंतु, हे करताना दिशानिर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. नागपुरात नागरिकांकडून दिशानिर्देशांचे पालन होत नाही, हे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे. नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. आज ११ जुलै आहे. चार महिन्यात रुग्णांची संख्या १७८९ इतकी आहे. मात्र, ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाट्याने वाढली. राज्य शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केले. याअंतर्गत काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशांचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली. जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते. मात्र, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या दिशानिर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले आहे. ३१ मे पर्यंत रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. मात्र आज ॲक्टिव्ह रुग्णसंख्याच ५४४ आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह नवा हॉटस्पॉट बनला आहे. कारागृहातील ५०० कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ३०० कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अजून सुमारे १२०० जणांची चाचणी व्हायची आहे. त्यातून मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. आता नवे हॉटस्पॉट टाळायचे असतील, रुग्णसंख्येवर आळा घालायचा असेल तर शासन दिशानिर्देशांच्या पालन करण्यासोबतच स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वयंशिस्त की संचारबंदी हा निर्णय नागरिकांना घ्यायचा आहे. स्वयंशिस्तीतून शासन, प्रशासनाच्या दिशानिर्देशांचे पालन केले नाही तर पुन्हा संचारबंदीसारखा कठोर निर्णय प्रशासनाला घ्यावा लागेल, असा सज्जड इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Videos similaires